Pune Crime : ‘आमची मुलगी शोधून द्या, नाहीतर आम्हांला गोळ्या तरी घाला…;, असा हृदयहेलावून टाकणारा आक्रोश करत पुण्याच्या कुंजीरवाडी येथील एका हताश माता-पित्याने लोणी काळभोर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. क्लासला गेलेली त्यांची १४ वर्षीय मुलगी गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असून, तिचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या कारभारावर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘पुढील दोन दिवसांत लेकीचा पत्ता लागला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करू’, असा थेट इशारा या कुटुंबाने प्रशासनाला दिला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता नववीत शिकणारी ही अल्पवयीन मुलगी १४ एप्रिल २०२६ रोजी नेहमीप्रमाणे खाजगी शिकवणीसाठी घराबाहेर पडली होती. सकाळी ९:५० च्या सुमारास तिच्या सख्ख्या भावाने तिला दुचाकीवरून क्लासजवळ सोडले होते. साडेअकरा वाजता क्लास सुटल्यानंतर सर्व मुले बाहेर आली, मात्र बहीण न दिसल्याने भावाने आत जाऊन शिक्षकांकडे विचारणा केली. त्यावेळी ‘ती आज क्लासला आलीच नव्हती’, असे धक्कादायक उत्तर शिक्षकांनी दिले. तेव्हापासून ती बेपत्ता आहे.
तरुणावर अपहरणाचा संशय
मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच सुगावा लागला नाही. तपासादरम्यान समाधान उर्फ सुशील गंगाधर सूर्यवंशी (वय २४) या तरुणानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘आता आमच्याकडे दुसरा पर्याय नाही’
“गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला, तरी पोलीस आमच्या मुलीचा शोध घेऊ शकलेले नाहीत. रोज पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवून आम्ही थकलो आहोत,” अशी आर्त व्यथा मांडत पालकांनी गुरुवारी (२१ मे) पोलीस कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यांच्या हातातील फलक आणि डोळ्यांतील अश्रू पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले होते.
माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार: पोलीस
या गंभीर आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अधिकृत माहिती दिली की, “लोणी काळभोर पोलिसांची वेगवेगळी पथके तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा कसून शोध घेत आहेत. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या आरोपीबद्दल किंवा मुलीबद्दल जी व्यक्ती अचूक माहिती देईल, तिला पोलिसांतर्फे योग्य ते बक्षीस दिले जाईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त राखले जाईल.”


