Pune Rain: गेल्या काही दिवसांपासून कमालीच्या उष्णतेचा सामना करणाऱ्या पुणेकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला आज मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, या पावसामुळे हवेत निर्माण झालेल्या गारव्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुटकेचा श्वास दिला आहे.
भोरमध्ये मुसळधार; पिंपरीत दुपारीच झाला अंधार
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला होता. आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, त्यानंतर दुपारी पूर्व आणि पश्चिम भागातील उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यातील भोर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये दुपारी ४ च्या सुमारास अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले आणि संपूर्ण परिसरात अंधारमय वातावरण तयार झाले. यानंतर शहरात तुफान पाऊस कोसळला. गेल्या दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आज अखेर बरसल्याने पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपली आहे.
कोंढव्यात रस्त्यांना आले नदीचे स्वरूप
अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. कोंढवा परिसरातील प्रसिद्ध ज्योती चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक वाहनचालकांना या साचलेल्या पाण्यातूनच कसरत करत मार्ग काढावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे आडोसा शोधण्यासाठी नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सातारा आणि रायगडमध्येही हजेरी
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात पुढील दोन दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. केवळ पुणेच नव्हे, तर शेजारील सातारा जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्येही आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे.


