CNG Price Hike : महागाईने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर आता CNGच्या दरातही पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा CNG महागल्याने वाहनचालक आणि रिक्षाचालकांच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.
कालपर्यंत CNGचा दर ८०.०९ रुपये प्रति किलो होता. मात्र आता त्यामध्ये आणखी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ मे रोजी २ रुपयांनी आणि १८ मे रोजी १ रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत CNG तब्बल ४ रुपयांनी महागला आहे.
वाहनचालकांच्या खिशाला कात्री
दरवाढ जरी टप्प्याटप्प्याने होत असली तरी त्याचा थेट परिणाम रोजच्या प्रवास खर्चावर होत आहे. विशेषतः रिक्षाचालक, टॅक्सी चालक आणि CNG वाहन वापरणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक गणितावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही शहरांमध्ये रिक्षा भाडेवाढीची चर्चा सुरू झाली असून, येत्या काळात प्रवास महागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पेट्रोल-डिझेलही महाग
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोलमध्ये ८७ पैशांची तर डिझेलमध्ये ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधन दरांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली असून एकूण वाढ ५ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
सरकारकडून इंधन तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील CNG दर
- मुंबईतील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति किलो आहेत.
- पुण्यातील सीएनजीचे दर ९२.५० रुपये प्रति किलो आहेत.
- साताऱ्यातील सीएनजीचे दर ९५.५० रुपये प्रति किलो आहेत.
- कोल्हापूरमधील सीएनजीचे दर ९६.९५ रुपये प्रति किलो आहेत.
- ठाण्यातील सीएनजीचे दर ८१.०० रुपये प्रति किलो आहेत.


