Pune Lightning Strike: राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी हवामानाने पुणे जिल्ह्यात एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडवली आहे. भोर-खंडाळा रस्त्यावरून दोन दुचाकींवर प्रवास करणाऱ्या चार मित्रांवर अचानक वीज कोसळली. आकाशातून झालेल्या या थेट आघातामध्ये एका २२ वर्षांच्या तरुणाचा गाडीवरच होरपळून जागीच मृत्यू झाला, तर त्याचे इतर तीन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथील चार जिवलग मित्र कान्हवडी भागातून आपल्या गावाकडे दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून परतत होते. शुक्रवारी दुपारी भोर परिसरात अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. दुपारी हे चारही तरुण उत्रौली गावच्या हद्दीतील परिट माळ परिसरात आले असता, अचानक एका चालत्या दुचाकीवर थेट वीज पडली. हा विजेचा धक्का इतका प्रचंड होता की, दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा थरकाप उडवणारा अंत झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण वडगाव डाळ गावावर शोककळा पसरली आहे.
तरुणाचा जागीच कोळसा –
विजेचा मुख्य झटका मुख्य दुचाकीस्वार शंकर याला बसल्याने त्याचा कोळसा झाला. त्याच्या मागे बसलेल्या सागरला विजेचा थेट स्पर्श झाल्याने तो गंभीर भाजला आहे, तर दुसऱ्या दुचाकीवरील चंद्रकांत आणि अनिल हे दोघे विजांच्या तीव्र धक्क्याने व गाडीवरून खाली पडल्याने जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून सर्वांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले.
प्रशासनाकडून पंचनामा आणि तातडीने मदतीची घोषणा
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाचा ताबा घेतला. नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, प्रमोद बोरचाटे आणि राजेश जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून सविस्तर पंचनामा केला आहे. निसर्गाच्या या भयानक प्रकोपात मृत्युमुखी पडलेल्या शंकर काटेकर यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमावलीनुसार कायदेशीर आर्थिक मदत लवकरात लवकर सुपूर्द केली जाईल, अशी माहिती भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली आहे.


