Cockroach Janta Party: देशातील जनतेचा वाढता रोष आणि केंद्र सरकारविरोधातील असंतोष दडपण्यासाठी हुकूमशाही सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सोशल मीडिया अकाऊंट अचानक ब्लॉक आणि हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ‘आयबी’ (IB) सक्रिय असल्याचा खळबळजनक दावा पटोले यांनी केला असून, या थेट आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘आयबी’च्या गोपनीय अहवालानंतर थेट पंतप्रधानांकडून कारवाई?
नाना पटोले यांनी या कारवाईमागील एक गुप्त संदर्भ जाहीर केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, देशात सध्या सरकारविरोधात निर्माण झालेला जनक्षोभ जर वेळीच आवरला नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असा एक गुप्त अहवाल ‘आयबी’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवला होता. हाच संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी आणि जनतेचा आवाज दाबण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींच्या आदेशावरून हे सोशल मीडिया अकाऊंट हॅक आणि ब्लॉक करण्यात आल्याचा संशय पटोलेंनी व्यक्त केला आहे. “विरोधकांची आणि डिजिटल माध्यमांची कोंडी करून केंद्र सरकार वास्तवावर पांघरूण घालू शकत नाही. पंतप्रधानांनी डिजिटल अकाऊंट्स बंद करण्यापेक्षा आयबीला देशातील शेतकरी, गरीब आणि बेरोजगार तरुणांच्या खदखदणाऱ्या असंतोषाची खरी माहिती विचारावी,” असा सल्लाही त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांच्या ‘वंदे भारत’ प्रवासावर सडकून टीका; ‘रील’ बनवण्याचा छंद
दुसऱ्या बाजूला, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरून नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई ते शिर्डी ‘वंदे भारत’ रेल्वे प्रवासाची जोरदार खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री केवळ प्रसिद्धीसाठी आणि सोशल मीडियावर ‘रील’ (Reels) पोस्ट करण्यासाठी रेल्वेने प्रवास करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयात जाण्यासाठी बाईक चालवली होती, त्यानंतर ते रोज काही बाईकवरून फिरत नाहीत; त्यांचा मोठा व्हीआयपी (VIP) ताफा कायम सोबत असतो. हा सगळा केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे, अशी टीका त्यांनी केली.
व्हीआयपी ताफ्यामुळे शासकीय पैशांचा अपव्यय; हिशोब देण्याचे आव्हान
फडणवीस वंदे भारत ट्रेनने शिर्डीला गेले असले, तरी तिथून पुढे ते रस्ते मार्गाने नागपूरला जाणार आहेत, याकडे पटोलेंनी लक्ष वेधले. या रस्ते प्रवासात प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांच्या सुरक्षा गाड्या त्यांच्या ताफ्यात सामील होतील. या संपूर्ण दौऱ्यात शेकडो लीटर सरकारी डिझेल जळणार असून जनतेच्या पैशांचा मोठा अपव्यय होणार आहे. त्यामुळे ‘इंधन बचती’चा देखावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात एकूण किती इंधन खर्च झाले, याचा हिशोब जनतेला द्यावा, असे थेट आव्हान नाना पटोले यांनी दिले आहे.


