Pune crime: पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका बांधकाम मजुराच्या कॅम्पमध्ये अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादाचा राग अनावर झाल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात थेट पाच किलोचा गॅस सिलेंडर घालून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या क्रूर कृत्यानंतर आरोपी पतीने पळून न जाता स्वतःहून पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
भांडणाचे पर्यावसन हत्येत
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पती-पत्नीमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात पतीने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलला आणि पत्नीच्या डोक्यात प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, रक्तस्त्राव होऊन महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पत्नीचा जीव घेतल्यानंतर आरोपीने थेट पोलीस चौकी गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि घटनास्थळी धाव घेतली. तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हत्येसाठी वापरलेला सिलेंडर जप्त केला आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत आणि संताप व्यक्त होत आहे.


