Monsoon Rain : उन्हाचा तडाखा आणि वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत नैऋत्य मान्सून देशात दाखल होण्याची शक्यता असून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर रविवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारपासून सलग तीन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, या दिलासादायक अंदाजासोबतच हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी चिंताजनक इशाराही दिला आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशभरात सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः मध्य भारत आणि दक्षिणेकडील भागात सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग ‘मान्सून कोअर झोन’मध्ये मोडतात. या भागातच कमी पावसाची शक्यता असल्याने खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्गासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते.
याशिवाय जून महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि अंतर्गत महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानासोबतच किमान तापमानही वाढलेले राहणार असल्याने रात्रीच्या वेळीही उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ परिस्थिती निर्माण झाल्यास पावसावर आणखी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा मान्सून महाराष्ट्रासाठी मिश्र स्वरूपाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


