Pune Lonavala Accident Tragedy: लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टायगर पॉइंट येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. परिसरातील निसर्गरम्य दृश्ये आपल्या कुटुंबीयांना मोबाईलवरील व्हिडिओ कॉलद्वारे दाखवत असताना त्यांचा तोल गेल्याने ते खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलांशी संवाद साधताना घडला अपघात
मृत व्यक्तीचे नाव राकेशकुमार मिश्रा (वय 50) असे असून ते लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे कार्यरत होते. गुरुवारी दुपारी ते एका मित्रासोबत टायगर पॉइंट परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी दरीच्या काठावर उभे राहून ते आपल्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि परिसरातील दृश्ये दाखवत होते. त्याचवेळी अचानक संतुलन बिघडल्याने ते सुमारे 450 फूट खोल दरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बचाव पथकाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळवले. तसेच त्यांच्या सहकाऱ्याने आयएनएस शिवाजी प्रशासनाशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक बचाव पथकाने शोधमोहीम राबवून मृतदेह दरीतून बाहेर काढला. संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह सुपूर्द करण्यात आला असून या घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
धोकादायक ठिकाणी उभ्या ट्रेलरला धडक; तरुणाचा मृत्यू
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत पुणे-सातारा महामार्गावर एका भीषण अपघातात 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला छोटा हत्ती वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत आर्यन अमोल घोडके (वय 17, रा. केतकावळे, ता. पुरंदर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.


