Pune Methanol Liquor Case: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित पुरवठा साखळीचा मागोवा घेत असताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडीत मोठी कारवाई करत मिथेनॉलचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त केला आहे. या कारवाईनंतर विषारी दारू निर्मितीमागील रसायन पुरवठ्याचे जाळे उघड होऊ लागले आहे.
भिवंडीतील गोदामावर छापा
तपासादरम्यान पुण्यात विकल्या गेलेल्या भेसळयुक्त दारूमध्ये वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा उगम भिवंडीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. त्यानंतर एफडीएच्या विशेष पथकाने ‘रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे 5,929 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले. हे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत घातक मानले जाते. प्राथमिक तपासात या साठ्याची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचेही आढळून आले आहे. खरेदी-विक्री आणि साठवणुकीशी संबंधित आवश्यक कागदपत्रांमध्ये या रसायनाचा उल्लेख नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
पुरवठा साखळीचा तपास वेगात
पोलिस आणि एफडीएच्या संयुक्त तपासातून मिथेनॉल पुण्यापर्यंत कसे पोहोचले याची माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांच्या मते, भिवंडीतून पुरवण्यात आलेले रसायन विविध मध्यस्थांच्या माध्यमातून पुणे परिसरात पोहोचवण्यात आले. त्यानंतर त्याचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करण्यात आली आणि ती विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात आली. या प्रकरणात आधीच अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
ठाण्यातही कारवाईचा धडाका
राज्यात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एफडीएने ठाणे जिल्ह्यातही व्यापक तपासणी मोहीम राबवली. विविध अन्न व पेय आस्थापनांवर छापे टाकून संशयास्पद माल जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान लाखो रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला असून काही आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यभर विशेष तपास मोहीम
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी संबंधित गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध विभागांमध्ये विशेष तपास आणि धाडींची मोहीम राबवण्यात येत आहे.
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक विभागांमध्ये एकाचवेळी कारवाया करण्यात आल्या आहेत. विषारी पदार्थ, भेसळयुक्त अन्न आणि बेकायदेशीर रसायन साठ्यांविरोधातील ही मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, पुणे विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा वाढल्याने राज्यभरात चिंता व्यक्त केली जात असून, दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.


