Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात क्रिकेट सरावादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे. शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये पिचवरील जड रोलर ओढत असताना तो अंगावरून गेल्याने 15 वर्षीय आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी याचा मृत्यू झाला.
बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शिवशक्ती मैदानावर क्रिकेट समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. नववीत शिक्षण घेणारा आरव या कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. शनिवारी सकाळी तो नियमित सरावासाठी मैदानावर आला असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांकडून क्रिकेट पिचवरील जड रोलर ओढून घेतला जात होता. यावेळी रोलर हलवताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याच क्षणी जड रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर आरवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेनंतर क्रीडा प्रशिक्षण केंद्रांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अल्पवयीन मुलांकडून जड यंत्रसामग्री हाताळून घेतल्याचा आरोप करण्यात येत असून, संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बार्शी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


