Dhananjay Deshmukh : बीड जिल्ह्यातील गाजलेल्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आणि त्याविरोधातील प्रतितक्रार या दोन्हीही खोट्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी हा निष्कर्ष काढला आहे.
समाधान खिंडकर यांनी तक्रारीत दावा केला होता की, धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने बंदूक काढून त्यांच्या डोक्याला लावली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस उपअधीक्षकांनी स्वतः तपास हाती घेतला. हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संबंधित व्यक्तींचे जबाब आणि इतर पुरावे तपासल्यानंतर फिर्यादींनी नमूद केलेल्या प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. वैयक्तिक आणि जुन्या वादातून एकमेकांना अडकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी खोट्या तक्रारी दिल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
या पार्श्वभूमीवर बीड ग्रामीण पोलिसांनी खोट्या तक्रारींद्वारे न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेनंतर धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत ते राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणातील पोलिसांच्या सुरुवातीच्या कारवाईवर आणि त्यानंतरच्या निष्कर्षांवरून आता विविध प्रश्न उपस्थित केले जात असून, हा विषय राज्यभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.


