Jayant Patil : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी सरसकट लाभ वाटप करण्यात आले, मात्र आता लाभार्थ्यांची छाननी करून मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेबाहेर काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सर्वांना लाभ देण्यात आला आणि त्याच महिलांच्या पाठिंब्यामुळे सरकार सत्तेत आले. मात्र आता छाननीच्या नावाखाली 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. पुढील वर्षभरात आणखी 50 ते 60 लाख महिलांना योजनेतून वगळले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
लाडकी बहीण योजना सुरू करताना संभाव्य गैरप्रकारांची माहिती नव्हती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर लाभार्थ्यांमध्ये बोगस नावे होती, तर गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना अनुदान कसे दिले गेले, याची जबाबदारी सरकारने निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रोहित पवारr यांनीही सोशल मीडियावर सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी 2.47 कोटी लाभार्थी असलेल्या योजनेतून 81 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, केवायसी हे केवळ निमित्त असून टप्प्याटप्प्याने योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत सरकारवर टीका केली असून, लाभार्थी महिलांना कोणताही त्रास देऊ नये, अशी मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यामागील कारणांबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.


