Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत राज्यातील 40 ठिकाणी छापेमारी करत प्रशासनाने 32 जणांना अटक केली असून 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 12.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही,” असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यातही FDAने मोठी कारवाई करत पाच ठिकाणी छापे टाकले. या धाडीत गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि संशयित अन्नपदार्थांसह तब्बल 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. काही व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
याशिवाय ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींवरही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. चुकीच्या दाव्यांद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांसह अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई केली जाईल, असा इशारा FDAकडून देण्यात आला आहे.
25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख निर्माण केली आहे. FDAमधील त्यांच्या आक्रमक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.


