पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची (मविआ) वज्रमुठ दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काँग्रेस भवन येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. व्यासपीठावर नेतेमंडळी एकजुटीचा संदेश देत असतानाच, बंद दाराआड झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या स्थानिक भूमिकेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. यामुळे पुण्यात ‘मविआ’मधील धुसफूस अजूनही कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.
सुप्रिया सुळेंसमोरच जुन्या जखमांवरून जाब विचारला
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी मागील महापालिका निवडणुकीतील कटू अनुभव सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले. “आम्ही महाविकास आघाडीचा भाग असतानाही आमच्या हक्काच्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने विरोधी उमेदवार का उभे केले?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच, आगामी काळात पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार आहे, यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत स्थानिक नेत्यांनी सुळेंसमोर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली.
जगतापांची अनुपस्थिती आणि धार्मिक यात्रेचे स्पष्टीकरण
काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, जगताप यांनी यावर तात्काळ पडदा टाकताना सांगितले की, “माझी ही अनुपस्थिती कोणत्याही राजकीय नाराजीमुळे नाही. मी 3 महिन्यांपूर्वीच 12 ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रेचे नियोजन केले होते. या पूर्वनियोजित धार्मिक दौऱ्यावर असल्यामुळे मला या बैठकीला उपस्थित राहता आले नाही.”
अंतर्गत वाद बाजूला सारून १२ जून रोजी महापालिकेवर धडकणार
जाहीर नाराजी आणि अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असले, तरी आगामी काळात शहराच्या प्रलंबित प्रश्नांवरून प्रशासनाविरुद्ध एकत्रित संघर्ष करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या कारभाराला जाब विचारण्यासाठी 12 जून रोजी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेणार आहेत. या संयुक्त आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून महापालिकेविरुद्ध आक्रमक भूमिका मांडणार आहेत.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नवनियुक्त शहराध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी, “आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुणेकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि महापालिकेतील विरोधकांची भूमिका अधिक टोकदार करण्यासाठी एकत्र लढणार आहोत,” असा विश्वास व्यक्त केला.


