Pune Water Crisis: पावसाळा तोंडावर आलेला असतानाच पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे सावट निर्माण झाले असून, महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच पाण्याच्या नियोजनासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
धरणांतील साठा घटला; प्रशासनाची वाढली चिंता
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या केवळ ५.७२ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या वापराचा वेग कायम राहिल्यास हा साठा जुलैअखेरपर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच यंदा सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले असून, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
पाणी बचतीसाठी मोठे नियोजन
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहराला दरमहा सुमारे १.६० टीएमसी पाण्याची गरज भासते. पुढील तीन महिन्यांसाठी ही गरज ४.८० टीएमसी इतकी आहे. याशिवाय बाष्पीभवनासाठी १.८० टीएमसी आणि शेतीसाठी ०.८० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध ५.७२ टीएमसी साठ्याच्या तुलनेत ही गरज मोठी असल्याने पाणी बचतीवर भर देण्यात येत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यास पुढील तीन महिन्यांत सुमारे १.४० टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
लोकप्रतिनिधींशी चर्चेनंतर होणार अंतिम निर्णय
पाण्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत पाणी बचतीच्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पुढील आठवड्यात पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


