Rajya Sabha Election : राज्यसभेच्या २४ रिक्त जागा आणि पोटनिवडणुकांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून काँग्रेसने पहिल्या टप्प्यात सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने काही विद्यमान नेत्यांवर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि मन्सूर अली खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधून मीनाक्षी नटराजन, राजस्थानमधून नीरज ढांगी, तामिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती आणि झारखंडमधून प्रणव झा यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत संबंधित राज्यांतील आमदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करता भाजपप्रणीत एनडीएची स्थिती अनेक राज्यांमध्ये मजबूत मानली जात आहे. त्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी एनडीए आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
यावेळी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून तेथील निकाल राज्यसभेतील आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतात. काँग्रेसच्या या पहिल्या यादीमुळे राज्यसभा निवडणुकीच्या राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.


