Rohit Pawar : अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सत्ताधारी पक्षांवर आणि अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.
शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये खरात प्रकरणात सत्तेतील तिन्ही घटक पक्षांतील काही नेत्यांचे संबंध असल्याचा दावा केला. मात्र, या प्रकरणात केवळ एका व्यक्तीवरच कारवाई आणि राजकीय दबाव आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी “माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली, तर दुसऱ्याच्या घरात आधीच दोन पदं असताना आता तिसरं पदही आलं” असा उल्लेख केला आहे. या विधानाचा संदर्भ रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्याशी जोडला जात असून राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, नुकतेच सुनील तटकरे यांची कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी कोणाचेही नाव थेट घेतले नसले तरी त्यांच्या पोस्टमधील उल्लेख आणि अलीकडील राजकीय घडामोडी यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.


