Pune Metro: पुण्यातील आयटी हब हिंजवडीला शहराशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाबाबत पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ३० जूनपर्यंत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या मार्गावरील प्रवासी सेवेला अखेर गती मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांची डेडलाईन, कामाला वेग
मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांना ३० जूनची अंतिम मुदत दिली. या बैठकीनंतर पीएमआरडीएने प्रकल्पातील उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
१५ जुलैपर्यंत पहिल्या १२ स्थानकांवरून सेवा
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक आणि किरकोळ अपूर्ण कामे पूर्ण करून १५ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंजवडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचारी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिवाजीनगरपर्यंतच्या पूर्ण सेवेसाठी आणखी प्रतीक्षा
मात्र, संपूर्ण हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरून अखंड प्रवास करण्यासाठी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर पुढील दीड ते दोन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करून सर्व २३ स्थानके पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


