Sachin Ghaywal : पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सचिनला सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावातून ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घायवळवर पुण्यात खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मकोका कारवाईनंतर तो पुण्यातून फरार झाला होता. पोलिसांनी सतत शोधमोहीम राबवली असता तो वारंवार ठिकाण बदलत असल्याने पकड टाळत होता.
अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात सापळा रचून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मकोका कारवाईनंतर तो काही काळ सोलापूरमध्ये आणि नंतर जयपूरमार्गे राजस्थानमध्ये वास्तव्यास होता. दिंगपूर गावात तो भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो महिन्याला भाडे देऊन आणि सोबत असलेल्या पैशांतून आपला खर्च भागवत होता.
दरम्यान, तपासात असेही समोर आले आहे की फरारी काळात तो मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर काही दिवस जगला असल्याची माहितीही पुढे आली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


