Soldiers Martyred: जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LoC) कर्तव्य बजावत असताना झालेल्या एका भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना वीरमरण आले आहे. उरी सेक्टरमध्ये मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील शहापूरचे रहिवासी अर्जुन जाधव आणि ऐरोलीचे रहिवासी विक्रम बालकृष्ण चव्हाण यांचा समावेश आहे. या दोन्ही सैनिकांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीनगरमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनोज साहू यांनी सांगितले की, श्रीनगरपासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात हा स्फोट झाला. गस्त घालत असताना अचानक झालेल्या या स्फोटात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. हा स्फोट लँडमाइनचा होता की इतर कशाचा, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून लष्कराकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.
दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न; भाऊ नौदलात कार्यरत
शहीद अर्जुन जाधव हे २०१६-१७ मध्ये देशसेवेसाठी भारतीय भूदलात दाखल झाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होण्यापूर्वी ते पुण्यात कार्यरत होते. अवघ्या दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच २०२४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात माता-पिता, पत्नी, एक मुलगा, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांचा लहान भाऊ ऋषी जाधव हे देखील भारतीय नौदलात (नेव्ही) कार्यरत असून देशसेवा करत आहेत.
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हायअलर्ट; यात्रा मार्ग ‘नो-फ्लाय झोन’ घोषित
दुसरीकडे, आगामी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने (CAPF) पहलगाम परिसरात संयुक्त ‘मॉक ड्रील’ (सराव मोहीम) राबवले. संभाव्य धोके लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
हेलिकॉप्टर सेवेवर तात्पुरती बंदी
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून यात्रा संपेपर्यंत पहलगाम आणि बालटाल या दोन्ही प्रमुख यात्रा मार्गांना ‘नो-फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या काळात पर्यटकांची व्यावसायिक हेलिकॉप्टर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.


