PMC Bomb Scare: पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसह महापौर कार्यालयाला बॉम्बने लक्ष्य करण्याची धक्कादायक धमकी एका ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पालिका प्रशासनात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर हा संदेश येताच, पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तातडीने पावले उचलत संपूर्ण मुख्य इमारत रिकामी करण्याचे निर्देश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या महापालिका परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा वेढा अधिक घट्ट करत पोलिसांनी इमारतीचे सर्व दरवाजे बंद केले असून, परिसराची नाकेबंदी केली आहे. पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून, सध्या सर्वजण इमारतीबाहेर थांबले आहेत. सुरक्षा पथकांकडून इमारतीतील प्रत्येक मजला, दालन आणि संशयास्पद जागांची कसून तपासणी केली जात आहे.
सायबर सेलकडून ई-मेलच्या स्रोताचा शोध सुरू
हा धमकीचा मेल पाठवणाऱ्याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे (Cyber Cell) तपास सोपवण्यात आला आहे. हा केवळ एखाद्याने केलेला खोडसाळपणा आहे की यामागे कोणताही मोठा घातपाताचा कट आहे, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सध्या पालिका परिसरात चिंतेचे वातावरण असले तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पोलिसांच्या शोधमोहिमेनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.


