इंदापूर: खोरोची येथे संकेत हेगडकर यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. निरंजन लहू पवार (रा. खोरोची) व जिजा ऊर्फ मयूर मोहन पाटोळे (रा. निमसाखर ता. इंदापूर) अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी सदर गुन्हा करून फरार झाले होते. त्यांनी पोलिसांना देखील आव्हान दिले होते. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदापूर गुन्हे शोध पथकाने रात्रीच्या अंधारात शिंदी खुर्द (ता. माण, जि. सातारा) येथील डोंगर परिसरात त्यांच्या मुसक्या आवळून त्यांचे आव्हान संपुष्टात आणल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
27 फेब्रुवारी रोजी निरवांगी (ता. इंदापूर) येथे उत्तम जालिंदर जाधव (रा. खोरोची) यांना अडवून त्यांचा तलवारीने, दगड व कोयत्याने निघृण खून करण्यात आला. सदरचे आरोपी हे वालचंदनगर येथील गुन्ह्यात देखील फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पथक शोधात होते. आरोपी हे शिंदी खुर्द येथील डोंगरावर वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. ते शिंदी खुर्द, दहीवडी भागातील डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसले होते. तेथे तीन दिवस माग काढून त्यांना अटक करण्यात आली.


