Purandar Airport : प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आणि सरपंचांच्या मागणीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डुडी यांच्या माहितीनुसार, विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 1 हजार 216 हेक्टर जमिनीपैकी 851 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत सुमारे 70 टक्के करारनामे जमा झाले असून जमीन संपादन प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रशासनाकडून मोबदला वितरणाची प्रक्रियाही वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे 950 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय पुढील आठवड्यात आणखी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
उर्वरित जमिनींचे अधिग्रहण आणि करार प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर येथे उभारण्यात येणारे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानले जाते. या प्रकल्पामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


