Pune curfew : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत जमावबंदी लागू केली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) आणि (3) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
हा आदेश 13 जून रोजी रात्री 12.05 वाजल्यापासून लागू होणार असून 26 जून रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काय राहणार बंद?
जमावबंदीच्या कालावधीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यासाठी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. तसेच खालील बाबींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
- दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे
- दगड, काठ्या, तलवारी, बंदुका किंवा इजा पोहोचवू शकणारी शस्त्रे बाळगणे
- मोठ्याने आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर घोषणा देणे
- प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे
- कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी उत्तेजक भाषणे करणे
काय सुरू राहणार?
शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. नियमित शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


