Tukaram Munde : पुणे जिल्ह्यातील यवत येथे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या तपासणीची चर्चा पसरताच व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कडक प्रशासकीय कारभारासाठी ओळखले जाणारे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचीच धास्ती असल्याचा प्रत्यय या घटनेतून आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवत परिसरात FDA विभागाचे अधिकारी तपासणीसाठी येणार असल्याची माहिती पसरली. ही चर्चा गावभर पसरताच हॉटेल्स, स्वीट मार्ट, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी दुकाने अर्धवट बंद केली, तर काहींनी थेट शटर खाली ओढत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, नंतर FDA विभागाचे कोणतेही अधिकारी यवतमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र तपासणी होण्याच्या शक्यतेनेच व्यापाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कारवाईबाबत व्यापाऱ्यांमध्ये किती गंभीरता आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. अधिकारी प्रत्यक्ष आले नसतानाही केवळ तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांची झालेली धावपळ आणि शटर डाऊनची परिस्थिती यामुळे गावात काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. हॉटेल्स, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादन युनिट्सवर सातत्याने तपासण्या होत असल्याने व्यापारी वर्ग अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. यवतमधील हा प्रकार प्रशासनाच्या कडक प्रतिमेची आणि त्याच्या प्रभावाची चर्चा पुन्हा एकदा रंगवणारा ठरला आहे.


