NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच दिला होता. काही कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाला असला तरी देशातील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि भाजपविरोधी शक्तींना बळकटी देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पटोले यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तृणमूल काँग्रेससह शरद पवार गटलाही या व्यापक राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी पुन्हा एकत्र यावे, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी समर्थन दिले. “जे पक्ष काँग्रेसमधून वेगळे झाले, त्यांनी आता पुन्हा एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असे गेहलोत म्हणाले.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. संजय राऊत यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत, विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय भविष्यातील राजकीय घडामोडींवर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली असून, आगामी काळात याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


