Jaspal Rana Passes Away: भारतीय क्रीडा जगतातून एक अत्यंत दुःखद वृत्त समोर आले आहे. भारताचे दिग्गज पिस्तूल नेमबाज आणि ख्यातनाम प्रशिक्षक जसपाल राणा यांचे शुक्रवारी (१२ जून) वयाच्या ४९ व्या वर्षी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. जर्मनीतील म्युनिक येथे पार पडलेल्या आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक स्पर्धाहून मायदेशी परतत असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. दिल्लीत पोहोचताच त्यांना तातडीने साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धा गाजवणारा भारताचा ‘गोल्डन बॉय’
जसपाल राणा यांनी १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय नेमबाजीत भारताचा दबदबा निर्माण केला होता. ज्या काळात भारतात नेमबाजी या खेळाला फारशी लोकप्रियता नव्हती, त्या काळात राणा यांनी आपल्या अचूक निशाण्याने जागतिक स्तरावर देशाची वेगळी ओळख निर्माण केली. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल आणि आशियाई चॅम्पियनशिप अशा विविध प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदके जिंकून भारताचे नाव उंचावले. त्यांच्या याच ऐतिहासिक कामगिरीने देशातील हजारो तरुणांना नेमबाजीकडे वळण्याची आणि या खेळात करिअर करण्याची नवी प्रेरणा दिली.
प्रशिक्षक म्हणूनही गाजवला दबदबा; मनू भाकरच्या ऑलिम्पिक यशाचे ठरले शिल्पकार
खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर जसपाल राणा यांनी प्रशिक्षक म्हणून दुसरी यशस्वी इनिंग सुरू केली. २०१२ मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण प्रणालीशी जोडले गेल्यावर त्यांनी ‘ज्युनियर पिस्तूल कार्यक्रमा’ची धुरा सांभाळली. त्यांनी तळागाळातील तरुण खेळाडूंना शोधून त्यांना जागतिक दर्जाचे नेमबाज बनवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले.
राणा यांच्या कोचिंग कारकिर्दीतील सुवर्णक्षण म्हणजे स्टार नेमबाज मनू भाकरसोबतचे त्यांचे काम. मनूच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाच्या आणि चढ-उतारांच्या काळात राणा यांनी तिला मार्गदर्शन केले, तिच्या कौशल्याला योग्य पैलू पाडले. याच खडतर प्रशिक्षणाच्या जोरावर मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदके जिंकून इतिहास रचला. भारताचे ‘हाय-परफॉर्मन्स कोच’ राहिलेल्या जसपाल राणा यांचे योगदान भारतीय नेमबाजीच्या इतिहासात नेहमीच सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.


