Sanjay Raut: अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल ५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भारतीय जनता पक्षाला (भाजप) लक्ष्य केले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती, काँग्रेसचे बळकटीकरण आणि महाराष्ट्रातील पक्षीय स्थिती यांवर परखड भाष्य केले. राम मंदिरातील कथित चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आपण लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
‘घरातलेच चोर कोण?’ राऊतांचा थेट सवाल
राम मंदिराच्या दानपेटीतील घोटाळ्यावर तीव्र संताप व्यक्त करत संजय राऊत म्हणाले, “प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण झालेल्या निधीतून ५ कोटी रुपये गायब होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मंदिराची संपूर्ण व्यवस्था भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नियंत्रणाखाली आहे. असे असताना प्रत्यक्ष मंदिराच्या निधीवर डल्ला मारण्याचे धाडस कोणी केले? मंदिर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अचानक गायब का करण्यात आले? हे घरातलेच चोर आहेत का, याचा खुलासा झाला पाहिजे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले की, भव्य सोहळे करणाऱ्या सरकारला मंदिरातील ही चोरी का रोखता आली नाही? हा अपहार करणारे शंभर टक्के भाजपशी संबंधित लोकच आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला.
बृजभूषण सिंहांच्या विधानाचा दाखला आणि अयोध्या दौरा
राऊत यांनी भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या एका वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, “बृजभूषण सिंह यांच्यासारख्या बाहुबली नेत्यालाही या घोटाळ्यावर बोलताना आपल्या जीवाची भीती वाटते, ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. या साऱ्या प्रकारामुळे उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ असून, आम्हाला प्रभू श्रीरामाचे बोलावणे आले आहे अशी आमची भावना झाली आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना लवकरच अयोध्येत दाखल होईल.” जे लोक देवाचा पैसा चोरू शकतात, त्यांच्यासाठी निवडणुकांमध्ये मते चोरणे, ईव्हीएममध्ये फेरफार करणे किंवा संविधान धोक्यात आणणे ही अगदी किरकोळ गोष्ट आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या बळकटीकरणाचे स्वागत
देशातील लोकशाही आणि घटनात्मक संस्थांच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना राऊत यांनी मजबूत विरोधी पक्षाची गरज प्रतिपादित केली. राहुल गांधी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत ते म्हणाले, “गेल्या १२ वर्षांतील देशाची स्थिती पाहता काँग्रेस अधिक मजबूत होण्याची गरज आहे. भूतकाळात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्व नेत्यांनी आणि घटकांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ पक्षाला ताकद दिली पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारच्या हालचाली सुरू असणे ही स्वागतार्ह बाब आहे.”


