Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या कारवाईच्या मोहिमेचा धडाका आता पुण्यातही पाहायला मिळाला. FDA च्या पथकाने पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात अचानक धाड टाकत विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरातील अनेक दुकानांची पाहणी करून स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी केली.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वच्छतेबाबत त्रुटी आढळून आल्याने संबंधित दुकानदारांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. ज्या दुकानांमध्ये अस्वच्छता आढळली, त्यांना पूर्ण स्वच्छता होईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात भेसळ, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात FDA ने कठोर भूमिका घेतली असून, येत्या काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वारगेटमधील या अचानक तपासणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.


