मुंबई : महाराष्ट्रात अद्यापही मान्सूनचे पूर्ण आगमन झाले नसल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार २० जूनपर्यंत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राला यलो अलर्ट
पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून का रखडला?
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रातील वातावरण अद्याप पूर्णपणे अनुकूल नसल्यामुळे मान्सूनची प्रगती गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. दुसरीकडे, मान्सूनने पूर्व भारतात मात्र वेग कायम ठेवला असून पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडच्या अनेक भागांत पुढे सरकला आहे.
पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता २० जूनपर्यंतच्या हवामान बदलांकडे लागले आहे.


