Plane Crash : अमेरिकेतील मिसौरी राज्यात रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बटलर मेमोरियल विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली असून, उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात विमानातील सर्व १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ स्कायडायव्हर्स आणि एका पायलटचा समावेश असल्याची माहिती स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. अपघातानंतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली, मात्र विमान पूर्णपणे जळून खाक झाल्याने कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.
विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल किंवा अन्य कोणते कारण या दुर्घटनेमागे आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनासह राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाचे (NTSB) अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


