US Iran Peace Deal : अमेरिका आणि इराण यांच्यात तब्बल १०८ दिवस चाललेल्या संघर्षानंतर शांततेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार झाल्याचा दावा केला असून, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडूनही या घडामोडींना दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.
माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये १० कलमी शांतता करारावर सहमती झाली आहे. १९ जून रोजी जिनिव्हा येथे या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता असून, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष बाघेर गालीबाफ उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स करारावर स्वाक्षरी करतील, अशी माहिती समोर आली आहे.
या करारात लेबनॉनसह विविध आघाड्यांवर कायमस्वरूपी शस्त्रसंधी, इराणने अण्वस्त्रनिर्मिती न करण्याची हमी, होर्मुज सामुद्रधुनीतील निर्बंध हटवणे तसेच इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल करण्यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय इराणसाठी ३०० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याचीही चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. या संभाव्य कराराच्या बातमीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली असून, त्याचा सकारात्मक परिणाम इंधन दर आणि अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या शांतता करारामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर, सोने-चांदीचे भाव आणि आयात-निर्यात क्षेत्रावर काय परिणाम होतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


