Abhijit Dipke: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) हा शब्द ट्रेंड होऊ लागल्यानंतर अभिजीत दीपके हे नाव पहिल्यांदा देशाच्या प्रकाशझोतात आले. या पक्षाशी संबंधित उपहासात्मक मीम्सनी (Memes) डिजिटल जगतात धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे लाखो फॉलोअर्स त्यांच्याशी जोडले गेले. अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यांनी या अनोख्या पक्षाची आणि चळवळीची सुरुवात थेट अमेरिकेत असताना केली होती. सध्या ते भारतात परतले असून विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीतून झाली ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना
या अनोख्या पक्षाच्या स्थापनेची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कथितरीत्या काही व्यक्तींचा उल्लेख “कॉकरोच” (झुरळ) असा केला होता. न्यायमूर्तींच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अभिजीत दीपके यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक उपहासात्मक चळवळ सुरू केली. या उपहासाचे रूपांतर अल्पावधीतच एका मोठ्या युवा संघटनेत झाले आणि दीपके या पक्षाचे मुख्य चेहरा बनले.
उपहासात्मक चळवळीला हिंसक वळण; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
सुरुवातीला केवळ इंटरनेटवरील एक मीम किंवा उपहासात्मक संकल्पना म्हणून सुरू झालेल्या या पक्षाला आता एका खऱ्याखुऱ्या ‘युवा चळवळी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. अभिजीत दीपके सध्या विविध राज्यांमध्ये जाऊन तरुणांना संबोधित करत आहेत आणि प्रसारमाध्यमांना मुलाखती देत आहेत. मात्र, जयपूरमधील या ताज्या घटनेमुळे आता या चळवळीला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. दीपके यांच्यावर झालेल्या या जाहीर हल्ल्यामुळे राजकारण कमालीचे तापले असून, या हल्लेखोराचे धागेदोरे नेमके कोणाशी जोडलेले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


