Mumbai News: घरगुती धान्य सुरक्षित ठेवण्याच्या एका प्रयत्नाने मुंबईतील एका कुटुंबावर मोठा आघात केला आहे. गिरगावमधील एका दोन वर्षांच्या चिमुरडीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. तांदळाला उंदीर आणि कीटका लागून नयेत म्हणून तिच्या पालकांनी डब्यात ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ हे अत्यंत तीव्र कीटकनाशक ठेवले होते. या रसायनाचा विषारी धूर श्वासावाटे पोटात गेल्यामुळेच चिमुरडीला ही गंभीर विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
अवघ्या १५ तासांत ३ वेळा हृदयविकाराचे झटके
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चिमुरडीला अवघ्या १५ तासांच्या आत तब्बल ३ वेळा कार्डिअॅक अरेस्ट (हृदयक्रिया बंद पडणे) आला होता. सध्या तिला ‘ॲडव्हान्स्ड लाईफ-सपोर्ट’ यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. या बालिकेला उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास होत असल्याने शरीरातील पाणी खूप कमी झाले होते. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिला हाजी अली येथील ‘एनएच एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल’मध्ये तातडीने हलवण्यात आले. रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुनू उदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती अतिशय नाजूक आहे.
‘टॉक्सिड्रोम’चे वैद्यकीय संकेत आणि घरगुती निष्काळजीपणा
सुरुवातीला हा नेहमीचा आजार वाटत असला, तरी मुलीची हृदयक्रिया वारंवार विस्कळीत होऊ लागल्याने डॉक्टरांचा संशय बळावला. कुटुंबातील एका डॉक्टर नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच घरातील तांदळाच्या मोठ्या डब्यात कीटकनाशकाच्या पुड्या ठेवल्या होत्या आणि घरात त्याचा उग्र वास पसरला होता. या डब्यात पाऊच ठेवल्यानंतरच घरातील दोन्ही मुलींना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. चिमुरडीच्या मोठ्या बहिणीची तब्येत दोन दिवसांत सुधारली, मात्र लहान मुलीची प्रकृती बिघडत गेली. हा संपूर्ण प्रकार ‘टॉक्सिड्रोम’ (विशिष्ट विषबाधेची लक्षणे) कडे बोट दाखवणारा असल्याने, या प्रकरणी आता ‘मेडिको-लीगल’ (वैद्यकीय-कायदेशीर) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘एक्मो’ आणि विशेष तंत्रज्ञानाद्वारे उपचार सुरू
‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ या विषावर बाजारात कोणताही थेट उतारा (अँटीडोट) उपलब्ध नाही. त्यामुळे बालरोग अतिदक्षता विभागातील (PICU) तज्ज्ञ डॉक्टर सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधनांचा वापर करून तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. चिमुरडीच्या शरीरातील हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य तात्पुरते सांभाळण्यासाठी तिला ‘एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन’वर ठेवण्यात आले आहे. रविवारपासून हा उपचार सुरू केल्यावर तिच्या हृदयाच्या कार्यात काहीशी सुधारणा झाली आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी २४ तास चालणारे विशेष डायलिसिस सुरू आहे.
दीड महिन्यात दुसरी धक्कादायक घटना
मुंबईत अवघ्या ४५ दिवसांपूर्वीच पायधुनी परिसरातील ‘डोकाडिया’ कुटुंबातील चार जणांचा उंदीर मारण्याचे औषध (झिंक फॉस्फाइड) मिसळलेले कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता गिरगावात कीटकनाशकाच्या वासामुळे चिमुरडी गंभीर झाल्याने धान्यांमध्ये रासायनिक औषधे वापरताना घ्यावयाच्या दक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


