Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत विविध अफवा पसरत असताना, त्यांचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख ओमराजे निंबाळकर यांनी ओमराजे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली. या चर्चेत ओमराजे यांनी आपण अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.
“तुम्हीच मला मोठं केलं आहे, आज मी खासदार आहे ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे. त्यामुळे मी कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असे ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, मागील काही दिवसांत ओमराजे निंबाळकर यांच्यावर पक्षातील काही नेत्यांकडून कठोर टीका झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. विशेषतः सोशल मीडियावर आणि राजकीय वक्तव्यांमधून झालेल्या टीकेमुळे त्यांना मानसिक त्रास झाल्याचेही बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेते वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी मध्यरात्री त्यांची भेट घेतली होती. या भेटीतही त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य करून ‘रीलस्टार’ अशी हिणवणी झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरली आहे. मात्र या सर्व घडामोडींनंतरही त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नसून, पुढील काही दिवसांत त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


