पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून शहरातील मध्यवर्ती भाग जोडणारा बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रोकडून हा निर्णय घेण्यात आला असून यामागे मेट्रो पादचारी पुलाच्या बांधकामाचे काम कारणीभूत आहे.
नेमकं कारण काय?
डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला भिडे पुलाशी जोडणारा नवा पादचारी पूल (Foot Over Bridge) उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी मोठे लोखंडी स्ट्रक्चर बसवणे आणि बांधकाम सुरक्षितपणे पूर्ण करणे आवश्यक असल्याने पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
वाहतुकीवर निर्बंध कसे असतील?
बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद
त्यानंतरही 7 जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाहतूक बंद, दिवसा मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू राहण्याची शक्यता
पुणेकरांना अडचणींची शक्यता
डेक्कन, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि मध्य पुणे जोडणारा हा पूल असल्याने रोजच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. विशेषतः ऑफिस टाइममध्ये गर्दी आणि वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
मेट्रो प्रशासनाचे आवाहन
पुणे मेट्रोने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून पर्यायी मार्गांचा वापर करावा, गर्दीच्या वेळेत या परिसरात टाळावे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
मेट्रो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्टेशनपर्यंत पोहोचणे अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असून शहरातील सार्वजनिक वाहतुकीला मोठा फायदा होईल.


