Maharashtra Rain Update : राज्यभर मान्सून सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, कोकण आणि राज्यातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील काही दिवसही राज्यभर पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे.
कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव जाणवत असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार सरींची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे.
घाटमाथा आणि डोंगराळ भागांतही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. अनेक भागांत पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


