Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबावरही मोठे संकट कोसळले आहे. सियाचे वडील प्रवीण गोयल यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे झालेल्या मानसिक धक्क्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे.
रुग्णालय प्रशासनाने प्रवीण गोयल यांच्या उपचारांवर विशेष लक्ष ठेवले असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिस तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
मुलीवर गंभीर आरोप झाल्यानंतर गोयल कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे. रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण गोयल यांनी, “माझी मुलगी असे कृत्य करू शकते, यावर आजही माझा विश्वास बसत नाही,” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सियाच्या आईनेही अत्यंत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. “जर सिया या हत्याकांडात दोषी आढळली, तर तिलाही त्याच लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून द्या,” असे ती म्हणाली. तसेच, “केतन आमच्या घरी यायचा, आम्ही दोघांच्या लग्नाची मोठ्या उत्साहाने तयारी करत होतो.
सिया आणि केतन नेहमी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. त्यांच्या नात्यात काही बिनसलं आहे, याचा आम्हाला कधीच संशय आला नाही. जर तिला हे लग्न करायचंच नव्हतं, तर लग्नाची तयारी आणि खरेदी कशासाठी केली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तपासातून आणखी महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


