CA Intermediate Result : डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आयोजित CA इंटरमीडिएट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्रासह डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर शार्दुलने हजारो विद्यार्थ्यांमध्ये अव्वल स्थान पटकावत मोठे यश मिळवले.
शार्दुलच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि संपूर्ण डोंबिवलीत आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशामुळे CA क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळाली आहे.
मुलाच्या यशाबद्दल बोलताना आई सीमा विचारे भावूक झाल्या. “हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. शार्दुल लहानपणापासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारा विद्यार्थी होता. त्याने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सर्व ज्येष्ठांचे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्याला हे यश मिळाले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वडील शेखर विचारे यांनीही मुलाच्या यशाचा अभिमान व्यक्त करत, “शार्दुलने प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या परिश्रमाचे हे यश असून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने त्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला,” असे सांगितले.
स्वतःच्या यशाबद्दल बोलताना शार्दुलने आई-वडील, शिक्षक, मित्र आणि स्वामी समर्थ यांचे आभार मानले. तसेच आपल्या यशामागील अभ्यासाचे गुपितही सांगितले. डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईतील आर. ए. पोद्दार महाविद्यालयातून इयत्ता ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर CA फाउंडेशन परीक्षेतही त्याने देशात तिसरा क्रमांक मिळवला होता.
CA इंटरमीडिएटच्या तयारीदरम्यान दररोज सात तास क्लासेस असायचे. त्यानंतर सकाळी आणि रात्री मिळून दोन ते चार तास अभ्यास करत असे. सुट्टीच्या काळात मात्र तो तब्बल आठ ते दहा तास अभ्यास करत होता. “टॉप १० मध्ये येण्याचा विश्वास होता, पण देवाच्या कृपेने देशात पहिला क्रमांक मिळाला,” अशी भावना शार्दुलने व्यक्त केली.


