पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा (गट-अ आणि गट-ब) संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ (Optional Subject) पूर्णपणे वगळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बदलामुळे मुख्य परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक एकसमानता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काय बदल होणार?
सध्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत उमेदवारांना एका वैकल्पिक विषयाचे दोन पेपर द्यावे लागत होते. प्रत्येक पेपर 250 गुणांचा असून एकूण 500 गुणांचे हे पेपर अनिवार्य होते. मात्र, 2027 पासून हे दोन्ही पेपर रद्द करण्यात येणार आहेत.
मुख्य परीक्षेचे एकूण गुण 1750 वरून 1250 इतके होतील.
मुलाखतीसह अंतिम गुणसंख्या 2025 वरून 1525 इतकी होईल.
2027 पासूनची सुधारित परीक्षा योजना
भाषा पेपर 1 (मराठी) : 300 गुण
भाषा पेपर 2 (इंग्रजी) : 300 गुण
निबंध (मराठी किंवा इंग्रजी) : 250 गुण
सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4 : प्रत्येकी 250 गुण
वैकल्पिक विषय पेपर 1 व 2 : पूर्णपणे वगळण्यात आले
एकूण लेखी परीक्षा : 1250 गुण
मुलाखत : 275 गुण
अंतिम गुणसंख्या : 1525 गुण
हा निर्णय का घेण्यात आला?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, देशातील अनेक राज्यांनी यापूर्वीच राज्यसेवा परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळले आहेत. यामध्ये तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा समावेश आहे. या राज्यांप्रमाणेच अधिक प्रमाणित आणि समान मूल्यमापन पद्धतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या परीक्षांमध्ये बदल नाही?
आयोगाने स्पष्ट केले आहे की हा बदल फक्त राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी लागू असेल. खालील परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही:
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा
स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
कृषी सेवा परीक्षा
अन्न व औषध प्रशासन सेवा परीक्षा
पशुवैद्यकीय सेवा परीक्षा
निरीक्षक वैधमापनशास्त्र परीक्षा
विद्यार्थ्यांसाठी याचा काय परिणाम?
या निर्णयामुळे आता राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वैकल्पिक विषयाऐवजी सामान्य अध्ययन, निबंध आणि भाषा विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच सर्व उमेदवारांचे मूल्यमापन एकाच निकषांवर होणार असल्याने स्पर्धा अधिक समसमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


