Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एका आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे घडलेल्या या अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन वाहनांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. घटनेनंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
या अपघातात आयटी इंजिनिअर संजय खंडाळगे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, जखमी झालेल्यांमध्ये एका कुटुंबातील पाच जणांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तिन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. सध्या जखमींवर उपचार सुरू असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


