Ashadhi Wari : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. भुसावळ-पंढरपूर, नागपूर-मिरज, नवी अमरावती-पंढरपूर आणि खामगाव-पंढरपूर या मार्गांवर एकूण १६ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पावसाळ्याच्या आगमनानंतर आषाढी वारीची चाहूल लागते आणि लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने वारकऱ्यांच्या प्रवासासाठी विशेष व्यवस्था केली असून, यामुळे खान्देश आणि विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, भुसावळ-पंढरपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता भुसावळहून सुटून पंढरपूरकडे रवाना होईल. तर गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून भुसावळकडे सुटणार आहे. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
नागपूर-मिरज विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१११९ ही विशेष रेल्वे २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून रवाना होईल.
खामगाव-पंढरपूर विशेष रेल्वे
खामगाव-पंढरपूर मार्गावरील गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगावहून सुटेल. तर गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून खामगावकडे रवाना होणार आहे.
आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत असल्याने मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. तसेच, या अतिरिक्त रेल्वे सेवांमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यास आणि प्रवास अधिक सुलभ करण्यास मदत होणार आहे.


