लातूर : येथील एका विद्यालयात शिक्षकी पेशाला काळिमा लागेल अशी घटना समोर आली आहे. हिंदी विषयाच्या शिक्षकानेच तीन विद्यार्थ्यांवर तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला. ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या दरम्यानच्या काळात हिंदी विषयाचा शिक्षक सोपान राजाराम कळमकर (४९, रा. अहमदनगर ह. मु. लातूर) या नराधमाने तो शिकवत असलेल्या विद्यालयातीलच तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केला.
तीन महिने सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकाराची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रभारी प्राचार्य यांच्याकडे केली. त्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल सादर होताच प्रभारी प्राचार्य यांच्या फिर्यादिवरून शिक्षक सोपान कळमकर याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नराधम शिक्षकाला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सपोनि. वैभव नेटके करत आहेत.


