मुंबई : महायुती सरकारची लोकप्रिय ठरलेली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ २१०० रुपये देण्यास तिजोरीत पैसेच नाहीत. अर्थखात्यात शकुनी महाभाग बसल्याची जोरदार टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. या टीकेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मंत्रीपद पहिल्यांदाच मिळाल्याने टीका करण्यापेक्षा शिरसाट यांनी अभ्यास करायला हवा, असा टोला लगावला. त्यामुळे सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरून जुंपल्याचे चित्र आहे.
राज्यात महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली. दोन लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी २१०० रुपये महिलांना देणार असल्याची घोषणा केली. मात्र, निवडणुकीनंतर छाननी सुरू केली. त्यामुळे ही योजना चांगलीच वादात सापडली. विरोधकांनी यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भविष्यात योज़ना बंद होईल, असा दावा केला होता. आता सरकारने सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी आणि आदिवासी विभागाचे ३३५ कोटी असे सुमारे ७४५ कोटी योजनेसाठी दिले. महायुतीत यावरून वाद रंगला आहे.


