पुणे: राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार, मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक हवामान आहे. मान्सूनने सोमवारी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत तसेच मालदीव आणि कोमोरिन तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही मान्सूनने प्रगती केली. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सोमवारी पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पावसाची नोंद झाली.
राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव, बीड जिल्ह्यात, तर नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात विजा, ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


