पिंपरी: इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेत बांधलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवरील कारवाईच्या वेळी शिरसाठ नावाच्या बीट निरीक्षकाने पैसे घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. दरम्यान, आरोप झालेल्या संबंधित बीट निरीक्षकाला नोटीस बजावत खुलासा मागविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत सुमारे ७ हजार २४५ चौरस मीटर क्षेत्रफळावर ३६ अनधिकृत बंगले उभारण्यात आले होते. ही बांधकामे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने न्यायालयाच्या आदेशाने या बंगल्यावर महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली. ही कारवाई होत असतानाच बंगले असलेल्या नागरिकांनी शिरसाठ नावाचा बीट निरीक्षक यायचा आणि ५० हजार, एक लाख रुपये घेऊन जायचा, असे आरोप माध्यमांसमोर केले. त्यानंतर पैसे घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधकामांना अभय दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अखेर महापालिका प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आहे. या संदर्भात मनोज लोणकर यांनी म्हटले आहे की, संबंधित बीट निरीक्षक संतोष शिरसाठ यापूर्वी दुसऱ्या प्रकरणात निलंबित असून असून त्याची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. लोकांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावत त्याच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे
शिरसाठचे पालिका प्रशासनालाच आव्हान
या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या बीट निरीक्षक संतोष शिरसाठ यांनी माध्यमासमोर येत बाजू मांडली. ही बाजू मांडताना एक प्रकारे महापालिका आयुक्त आणि प्रशासनालाच त्यांनी आव्हान दिले आहे. कारवाईला झालेल्या विलंबाबाबत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले. यावरून पालिकेतील आणखी काही अधिकारी अडचणीत येण्याची आणि माध्यमांसमोर बाजू मांडल्याने शिरसाठवर कारवाई होण्याची शक्यता आहे.


