पिंपरी : कार्ला येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास देहूरोड ते निगडी दरम्यान जकात नाक्याजवळ झाला.
अमितकुमार बाळासाहेब गवळी (वय ३४, मोशी प्राधिकरण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अमितकुमार यांचा लहान भाऊ अभिषेक बाळासाहेब गवळी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार आणि त्यांचा आते भाऊ धनंजय ठोंबरे हे मंगळवारी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना देहूरोड ते निगडी दरम्यान जकात नाक्याजवळ विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. यामुळे अमितकुमार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये अमितकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.


