छत्रपती संभाजीनगर: इनामी जमीन वर्ग २ मधून वर्ग १ करून चलन जनरेट करण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर २३ लाख रुपये यापूर्वी घेऊन उर्वरित १८ लाखांपैकी ५ लाखांची लाच स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) विनोद गोंडूराव खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. आंरोपी खिरोळकर याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील ४९ वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील ६ एकर १६ गुंठे ही वर्ग २ ची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्ट्री खरेदी खत करून २०२३ मध्ये विकत घेतलेली आहे. ही जमीन वर्ग २ ची असल्यामुळे ती वर्ग १ करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी यापूर्वी आरोपींनी २३ लाख रुपये घेतले होते. या जमिनीच्या नजराण्यांचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांनी १८ लाखांची मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी मे रोजी संपर्क साधला. २६ मे तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर यांच्या केबिनमध्ये पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये आणि फाईल पूर्ण झाल्यानंतर १३ लाख रुपये देण्याचे ठरले. २७ मे रोजी तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर ५ लाखांच्या लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताना पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली. यानंतर खिरोळकरला ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केबिन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी
खिरोळकर याला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने केबिनमधील कपाटांची, टेबलच्या कप्प्यांची झडती घेतली. तसेच कॉम्प्युटरची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. तब्बल अर्धा तास कसून तपासणी करण्यात आली. त्रिभुवन याचा कक्ष उघडण्याचा प्रयत्न पथकाने केला, मात्र त्याला कुलूप असल्याने त्याची तपासणी करण्यात आली नाही.


