मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे शिवसेना आणि मनसेची युती होणार, या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावण्याची शक्यता आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे. वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये आले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे केवळ एक योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच फडणवीस याठिकाणी का पोहोचले? असा प्रश्न आता विचारला जात आहे. फडणवीस आणि ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


