पुणे: पुणे जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेला आदेश दिले आहेत.
पाटील यांनी परिपत्रक काढून दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ (The Rights of Persons with Disability Act, 2016) नुसार दिव्यांग तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शासन सेवेत नियुक्त झालेल्या दिव्यांग कर्मचारी / पदोन्नती झालेल्या दिव्यांग कर्मवचारी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिव्यांगत्वाची फेर तपासणी अधिष्ठाता, ससुन सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडून करुन घेण्यात यावी.
तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा. दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यापासून एकही कर्मचारी वगळला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. भविष्यात याबाबत प्रशासकिय अथवा अन्य कुठलीही अडचण उदभवल्यास संबंधित कार्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.


